शुक्रवार, १० जून, २०११

माहिती अधिकार वापरा, पण दमानं!

माहितीच्या अधिकाराचा वापर करताना लोकांनी आपल्या प्रश्नांच्या संख्येबद्दल मर्यादा सांभाळायला हवी. तसेच याचिकाकर्त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर टाळावा अशा कठोर शब्दात केंद्रीय माहिती आयोगाने दिली आहे. एका याचिकाकर्त्यांने सोळा पानांवर विचारलेल्या १०० प्रश्नांच्या प्रकरणात आयोगाने हे विधान केले आहे.

कन्हैया लाल या याचिकाकर्त्याने दिल्लीतील एका सरकारी शाळेसंदर्भात माहिती मागितली होती. त्यावर शिक्षण मंडळाकडून मिळालेली माहितीने आपण असंतुष्ट असल्याची तक्रार कन्हैया लाल यांनी केद्रींय माहिती आयोगाकडे केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी शंभराहूनही अधिक प्रश्न सोळा पानांवर लिहून पाठवले होते. अशाप्रकारे शंभराहूनही अधिक प्रश्न सोळा पानांवर लिहून पाठवणे म्हणजे माहितीचा अधिकार बेजबाबदारपणे वापर करणे होय असं मत माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी व्यक्त केले आहे.

या प्रकरणी याचिकाकर्त्याला आपल्याला कोणती माहिती मिळाली नाही असे विचारले असता , त्याला त्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे नागरिकांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की सरकारी यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत असताना , त्यांवर अशाप्रकारे अयोग्य भार टाकणे चुकीचे आहे. तरीही योग्य माहिती देण्याचे काम अधिकारी प्रामाणिकपणे करत असल्याचा दावा मुख्य माहिती अधिका-यांनी केला आहे.

सरकार हे फक्त एकाच नागरिकाला जबाबदार नसून त्यावर संपूर्ण जनतेची जबाबदारी आहे , त्यामुळे कोणतीही माहिती विचारताना याचिकाकर्त्याला आपल्या जबाबदारीचे भान असायला हवे. त्याचप्रमाणे याचिकाकर्त्यांनी आपल्या प्रश्नांच्या संख्येवर नियंत्रण राखायला हवे , असेही आयोगातर्फे सांगण्यात आले आहे.

माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते असलेले बिभव कुमार यांच्या मते , कोणत्याही माणसाला कितीही प्रश्न विचारायचा अधिकार आहे. त्यामुळे अशाप्रकारे सामान्य जनतेला खडसावून केद्रींय माहिती आयोग सरकारी कर्मचा-यांना पाठीशी घालत आहे. याउलट भारतात अधिक माहिती विचारण्याचे प्रमाण खूपच कमी आहे , त्यामुळे अशा याचिकाकर्त्यांना खर तर प्रोत्साहन देण्याची गरज आहे. 
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली --2 Feb 2010, 1515 hrs IST http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-5527488,prtpage-1.cms

--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा