गुरुवार, ३ मार्च, २०११

महान्युज : कायदा माहितीचा अन् अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा


२२ तारखेलाच दुपारीच संचालकांच्या कार्यालयातून मनोज एक ऑर्डर घेऊन माझ्याकडे आला. ती वाचली आणि माझ्या आनंदाला पारावार उरलानाही. बर्‍याच दिवसांपासून जी इच्छा पूर्ण व्हावी याची वाट पाहत होतो ती इच्छा पूर्णहोणार म्हणून मी मनापासून खूष झालो. यशदा च्या माहिती अधिकारावरील प्रशिक्षणासाठी माझे नाव नॉमिनेट करण्यात आले होते. त्याचे ते आदेश होते. सहाजिकच ओठांवर वाक्य आले ... थॅक्स् टू प्रशासन !

दि. १ मार्च, सकाळी १०:०० वाजता मंत्रालयातील ६ व्या मजल्यावरील परिषद सभागृहात हजर झालो. बाहेर यशदाचे दीपक येणार्‍या प्रशिक्षणार्थींचे नाव नोंदणी करुन घेत होते. आत सभागृहात मंद आवाजात संतूरचे सूर कानावर पडत होते. हळूहळू सर्व प्रशिक्षणार्थी जमू लागले अन् बरोबर १०:१५ वाजता महेश यांनी प्रशिक्षणाच्या प्रास्ताविकास सुरुवात केली. तत्पूर्वी सर्वांना फाईल फोल्डर, यशदा ने प्रकाशित केलेले पुस्तक कायदा माहितीचा अन् अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा, डायरी, पेन देण्यात आले.

सभागृहातील पहिल्या रांगेतील खुर्चीत एक हसरे व्यक्तिमत्व बसले होते. अन् त्यांचे नाव पहिल्या सत्राचे व्याख्याते म्हण्नू पुकारण्यात आले. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या त्या व्यक्तीचे नाव होते रविकांत गौतमी. यशदामार्फत माहितीचा अधिकार या विषयावर ते व्याख्यान देतात. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्यांचे पहिले सत्र सुरु झाले.

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे सविस्तर विश्लेषण अगदी सोप्या भाषेत विविध उदाहरणांसहित कानावर पडू लागले. आणि सभागृहातील उपस्थित अधिकार्‍यांच्या मनातील या कायद्याविषयी वाटणारी अनामिक भीतीही नाहीशी होवू लागली. सुरुवातीच्या चिंताग्रस्त, गंभीर चेहर्‍यांची जागा आता हसर्‍या चेहर्‍यांनी घेतली होती. माहिती अधिकाराच्या निर्मितीपासून व्याप्तीविषयीची इत्यंभूत माहिती रविकांत गौतमी सर देत होते. एक एक कलम समजावून सांगत होते. सार्वजनिक प्राधिकरण, साहित्य, त्रयस्त पक्ष, proactive disclosure, जनमाहिती अधिकारी, माहिती अर्जाचा नमुना, कालमर्यादा, अपवाद, अशा विविध विषयांची माहिती कलम निहाय रविकांत सरांनी अत्यंत खुबीने सांगितली. काहीवेळाने मस्तपैकी चहाही आला अन् चहापिल्यानंतर अधिक तरतरीने दुसर्‍या सत्रासाठी आम्ही तयार झालो.
 
दुसरे सत्र होते ऍडव्होकेट गणेश हलकारे सरांचे. आपल्या सुमधुर आणि खुशखुशीत वक्तव्याने ऍड.हलकारे  सरांनी काही क्षणातच आम्हा सर्वाच्या मनावर पकड घेतली. एरवी माहितीचा अधिकार अधिनियम २००५  विषयी वाटणारी भीती एव्हाना कुठल्या कुठे गायब झाली होती. आम्हीही अधिक एकाग्रतेने हलकारे सरांचे व्याख्यान ऐकत होतो. मधूनमधून बोलकी उदाहरणे सांगून या सत्राची रंगत आणखीनच वाढत होती. माहिती आयोगाची रचना, कार्य, केंद्रीय माहिती आयोग, अपील, शास्ती, माहितीचे पृथ्थ:करण, न्यायालयाची भूमिका अशा विविध विषयांची माहिती अगदी सहजपणे आम्हाला सांगण्यात येत होती.

हे सत्र संपले अन् जेवण करण्यासाठी ४५ मिनिटांचा ब्रेक देण्यात आला. बरोबर २:१५ वाजता पुढील सत्र सुरु झाले. जेवण अतिशय स्वादिष्ट होते त्यामुळे आम्ही निद्रादेवीच्या अधीन होवू नये याची हलकारे सर अत्यंत खुबीने काळजी घेत होते आणि माहितीच्या अधिकाराच्या पुढील कलमांचा अभ्यासही अगदी सुरळित पार पडत होता.

त्यानंतर गौतमी सरांनी अभिलेख व्यवस्थापनाबद्दलची माहिती दिली. साधारणत: एक दीड तासाने पुन्हा एकदा चहा आला, मागोमाग गौतमी सर आणि डॉ.पुलकुंडवार सरही हजर झाले.

मग सुरु झाले सवाल जवाब .. ...
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ च्या अभ्यासात माहीर असलेले रविकांत गौतमी, ऍड. गणेश हलकारे सर आणि डॉ.पुलकुंडवार (साक्षात् ब्रम्हा विष्णू महेश) आम्हा प्रशिक्षणार्थ्याकडून विचारल्या जाणार्‍या प्रश्नांना अत्यंत अभ्यासपूर्वक उत्तरे देत होते. त्यांच्या उत्तरातूनच त्यांच्या अनुभवाचा अन् अभ्यासाचा आवाका सहजच लक्षात येत होता.

खरं सांगायचं तर आम्हा प्रशिक्षणार्थ्याना हा विषय इतका सविस्तर, सहजपणे माहित करुन घेण्यात आला होता की, कुणालाच कोणतीही शंका उरली नाही. त्यामुळे जेव्हा आम्ही फीडबॅक फॉर्म भरायला घेतला तेव्हा नकळतच या सर्वांच्या शिकविण्याबाबतच्या अभिप्रायाला अत्यकृष्ट म्हणून नोंद झाली. या सर्व प्रशिक्षणासाठी विवेक वेलणकर यांनी प्रकल्प संचालक, महेश आलमले यांनी प्रकल्प अधिकारी म्हणून तर दत्तात्रय रोकडे आणि दीपक राऊत यांनी प्रकल्प सहायक म्हणून जबाबदारी पार पाडली. आम्हा सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतची प्रमाणपत्रही देण्यात आली.

या प्रशिक्षण कार्यशाळेत आम्हा सर्वांना काही पुस्तकेही देण्यात आली. त्यातील यशवंतराव चव्हाण विकास  प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे यांनी प्रकाशित केलेले, प्रल्हाद कचरे आणि शेखर गायकवाड लिखित कायदा माहितीचा अन् अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा या पुस्तकास तर माहिती अधिकाराची गीता म्हटले तर निश्चितच काहीही वावगं ठरणार नाही. इतकं ते पुस्तक अप्रतिम आहे. या कार्यशाळेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे वेळेचे व्यवस्थापन. अगदी वेळेवर सुरुवात, वेळेवर चहा, वेळेवर जेवण, व्याख्यात्यांचं वेळेवर आगमन, सर्व काही अगदी काटेकोरपणे. व्यवस्थापनाच्या बाबतीत यशदा ही संस्था नेहमीच यशस्वी ठरली आहे. आपल्यालाही त्यांचा अनुभव आला असेलच किंवा भविष्यात येईलही.

भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला असता ब्रिटीशांनी रुढ केलेल्या चुकीच्या पद्धतीचे, नियमांचे विश्लेषणही या कार्यशाळेत करण्यात आले. आणि भारत देश नेहमीच प्रगतीशील राष्ट्र राहील, तो कधीच प्रगत राष्ट्र होणार नाही याची व्यवस्था ब्रिटीशांनी कशी करुन ठेवली आहे याचे जेव्हा ऍड. हलकारे आणि रविकांत सर यांनी विवेचन केले तेव्हा मन खरोखरीच सुन्न झाले. परंतु माहितीचा अधिकार अधिनियम २००५ ने मात्र उद्याचा भारत हा निश्चितच नुसते प्रगत राष्ट्रच नव्हेतर जागतिक महासत्तेत सर्वात प्रबळ राष्ट्र बनणारच याची खात्री दिली आहे. फक्त यासाठी गरज आहे ती आपण सर्वांनी या कायद्याविषयी सकारात्मक आणि विकासात्मक दृष्टीने पाहण्याची !

एकूणच ही कार्यशाळा सुरु होण्यापूर्वी जी मानसिकता होती की, हम तो डुबेंगे सनम, मगर...या मानसिकतेचे कार्यशाळा संपताना मात्र हम तो बचेंगे सनम मगर आपको भी बचाके रहेंगे यात परिवर्तन झालेले दिसले. आणि मग सर्वजण एकत्रितपणे म्हणतात... माहितीचा अधिकार अधिनियम २००५ .. जय हो !

  ...मनोज सानप

'महान्यूज'मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल. 
Source: http://www.mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=msLsOxlsEZ6|p53wzRS1WoqkP0wl9rt6xAvuMygS9EqmUqy3jzjHbQ==